भज गोविन्दम ॥१॥

Friday, December 26, 2014

|| वासुदेव ||

                                                               आमची परंपरा - वासुदेव




जय हरी ! वासुदेव हरी !
   मला आठवते , आम्ही लहान असतांना म्हणजे साधारणपणे १९६०-च्या दरम्यानचा काळ . आम्ही खेड्यात, बुऱ्हानागाराला  राहत होतो तेव्हा सर्व गाव मिळून ७०-८० उंबरा असेल . गावात वीज नव्हती , ग्यासची तर बातच नको . घरोघर चिमण्या असायच्या चिमण्या म्हणजे  छोटा दिवा पैसेवाल्याच्या घरी कंदील असायचे . गावात चौकात ग्रामपंचायतीचे खांबावरील काचेचे मोठे कंदील असायचे . तेव्हाचे खेळ म्हणजे आट्या-पाट्या , हुतुतू, चिले, चीरघोडी , लपाछपी , सूरपारंब्या, शिवणापाणी , खप मजा यायची गावात फक्त चौथीपर्यंतच शाळा होती . मुले शाळेत गेली नाही कि मग " उचलबांगडी " करून त्याला पोर न्यायाची . देव धर्म यावर श्रद्धा असायची गावातील मारुतीच्या मंदिरात दररोज पांडव प्रताप, हरिविजय, नवनाथ असे ग्रंथ गावातील एकमेव वारकरी देवरामबुवा  वाचीत असे संध्याकाळी थकल्या भागल्या जीवाला तेवढीच मानसिक , भावनिक विश्रांती मिळायची . . गावातील प्रमुख व्यवसाय म्हणजे शेतीच असायचा . काही क्वचित लोक सरकारी सेवेत असायचे ते म्हणजे " मैल कोले " , पण त्यांना गावात इतका मान  कि विचारू नका . . गावात फक्त एकाच माणसाकडे रेडीओ होता तो दुकानदार होता शहराम त्याचे नाव संध्याकाळी आम्ही सर्व त्याच्या दुकानाकडे जमायचे कारण तेथे रेडीओवर " कामगार सभा " ऐकायला मिळायची . असे हे सर्व वातावरण फारच छान वाटायचे .
                        त्यावेळी गावात वेगवेगळे कलाकार यायचे त्यांना गावात आधार मिळायचा . पोतराज , गाडगेबाबांच्या परमंपरेतील कीर्तनकार यायचे ८-१० दिवस राहयचे रोज रात्री कीर्तन असायचे तत्वज्ञानाचा भाग कमी पण समाज प्रबोधन जास्त . राम लीलावले उत्तर प्रदेशातील लोक सुद्धा यायचे ते महिनाभर थांबायचे . विशेष म्हणजे तमाशे सुद्धा यायचे त्याला " गंमत " म्हणायचे कानातीशिवाय हा तमाशा असायचा . तरुणाना त्याचे फार आकर्षण . चोरून त्यातील बायकांना बघायला जायचे . . जत्रा ,यात्रा हे सर्व प्रकार लोकपरंपरा जतन करणारे असायचे .
                          पाहटे गुडगुड्या बाबा , पांगुळ, वासुदेव हे यायचे आणि झोपलेल्या लोकांना जागे करायचे . त्यांचे हे जागे करणे म्हणजे नुसते झोपेतून जागे करणे असे नसून अज्ञानाच्या घोर निद्रेतूनही जागे करणे असायचे पण आम्हाला ते समजत नसायचे .    गुडगुड्या बाबा  हातात  कंदील , काखेत झोळी , दुसर्या हातात गुडगुडी असा त्याचा वेश असायचा तो गुडगुडी वाजवीत यायचा गावातील कुत्री त्याला भुंकत असत पण गुडगुडीच्या आवाजाने त्याच्या जवळ जात नसत  साखर झोपेतून हळूच जाग यायची आणि डोळे चोळीत गुडगुड्या बाबा बघयला जायचो . बायका त्याला धान्य पीठ वाढायच्या . तसाच आणखी एक प्रकार तो म्हणजे पांगुळ हा सुद्धा पहाटेच यायचा पण पांगुळ गावातील मध्यवर्ती भागातील एका पिंपळाच्या झाडावर चढून बसायचा आणि तेथून तो सुंदर त्याच्या किनाऱ्या आवाजात " पांगुळ झालो देवा , नाही हात ना पाय । बैसलो जयावरी सैराट ते जाय । खेटता कुंप काटी खुंट दरडी न पाहे । आधार नाही कोणी मज बाप ना माय ।। दाते हो दान करा जाते पंढरपुरा ।। " असा हा पांगुळ अध्यात्मिक बोध  भल्या पहाटे करीत लोकांना आत्मस्वरूपाची जागृती आणीत होता . बायका त्याला एका सुपात धन्य कुंकवाचा करंडा तो ज्या झाडावर असे त्याच्या खाली ठेवून परत घरी येत असत . सकाळी पांगुळ झाडावरून खाली उतरून सर्व धन्य एकत्र गोळा  करून कुंकवाच लेण लेऊन करंडा परत सुपात ठेऊन निघून जायचा . किती सुंदर परमंपरा .
                             सूर्योदय झाला कि आवाज यायचा " दान पावलं , वासुदेवाला दान पावलं , पंढरीच्या विठोबाला, जेजुरीच्या खंडोबारायला , मोरगावच्या गजाननाला , तुळजापूराच्या अंबाबाईला दान पावल. याचा वेष  मोठा सुंदर असायचा अंगात सुंदर  असा मोठा झगा असायचा त्याच्यावर छानपैकी नक्षीकाम , गळ्यात तुळशीच्या, रुद्राक्षाच्या माळा कपाळाला ठसठसित  गंध , दोन टांगी  धोतर, डोक्यावर एक पागोटे आणि त्यावर मोरपिसाची भली मोठी गोल निमुळती टोपी ,एका  हातात चीपूळ्या , दुसऱ्या  हातात टाळ ,एका तालात स्वरात तो गायचा ,
" गातो वासुदेव मी ऐका । चित्त ठाई ठेवोनी भावे एका । डोळे झाकोनी रात्र करू नका । काळ करीत बैसलासे लेखा गा ।। राम राम स्मर आधी …….  तुकया बंधू कान्होबाराय
गेले टळले पहार तीन । काय निदसुरा निजसी अजून । जागे होईन करा काही दान । नका ऐकोनी झाकू लोचन गा ।। हरी राम कृष्णा । वासुदेव जाणवितसे जना  ।। तुकया बंधू कान्होबाराय ।।
कान्होबारायांचा हा वासुदेव लोकांना जागे करून म्हणतो कि आता खरे तर ज्ञानाचा सूर्योदय झाला उगीच डोळे झाकून रात्र करू नका , काळ केव्हा घेऊन जाईल याचा नेम नाही तीन प्रहर रात्र सरून गेली आहे आणि हे निदसुरा अजून काय निजातोस ? जागे होऊन वासुदेवाला काही दान करा .
   ``बोल अबोलणे बोले । जागे बाहेर आत निजेले । कैसे घरात घरकुल केले । नेणो अंधार ना उजाडले गा ।। वासुदेव करितो फेरा ।वाडीयात बाहेर दारा ।कोणी काही तरी दान पुण्य करा । जाब नेदा तरी जातो माघारा  गा ।। संत तुकाराम - यांचा वसुदेव अबोलणे म्हणजे अत्म्याविषयी शब्दात काही बोलता येत नाही  त्याच्याविषयी बोलणे , सर्व लोक प्रपंचात जागे आहेत पण आत म्हणजे स्वरूपावर निजले आहेत ( अज्ञान हीच झोप ) यांना अंधार आहे कि उजेड आहे हेच काळात नाही आणि म्हणूनच (संत ) वासुदेव तुमच्या गावात, वाड्याबाहेर , ( वाडा  म्हणजे देह ) फेरा करीत आहे जागे होऊन काही तरी दान पुण्य करा आणि दान द्यावे लागेल म्हणून जर तुम्ही उत्तर देत नसाल तर मी माघारी जातो .
        कर जोडोनी विनवितो तुम्हा । नका करू संसार श्रमा । नका गुंतू विषय कामा । तुम्ही आठवा मधुसूदना ।। तुही वासुदेव वासुदेव म्हणा । संत एकनाथ
      बाबा अहंकार निशी घनदाट । गुरुवचने फुटली पहाट । माता भक्ती भेटली बरावंट  । तिने मार्ग दाविला चोखट गा ।। नरहरि रामा गोविंदा वासुदेवा ।। संत नामदेव ।।
     घुळघुळा वाजती टाळ । झनझणा नाद रसाळ । उदो जाहला पाहली वेळ । उठा वाचे वदा गोपाळ गा ।।कैसा वासुदेव बोलतो बोल । संत ज्ञानेश्वर
   याच लोकपरंपरेतील वसुदेवाचा आधार घेत आपल्या संतींनी अध्यात्मिक उपदेशही केला आहे . असा हा वासुदेव लोक जागृती करीत होता आणि प्रत्येकाची सकाळची सुरवात मोठी गोड करीत होता ,काही तरी दान देण्याची वृत्ती जागी होती . आपण जे कमावतो ते काही एकट्याकरिता नव्हे तर त्यात अनेकांचा वाट आहे हि समाज जागृती हा वासुदेव करीत होता . प्रत्येक जन आपापले काम करीत होता आणि समाजाचा हा गाडा सुरळीत चालत होता . खेड्यामधील  हे जीवन मोठ रंजक तर होतेच पण गरजा कमी आणि स्वास्थ्य चांगले होते . विशेष म्हणजे गावात एकही दवाखाना नव्हता . नळ नव्हते तर बारावेतून  ५०-६० पायऱ्या चढून पाणी आणावे लागत होते . पाहटे आई जात्यावर दळण दळीत असतांना ज्या ओव्या गात होती त्याची गोडी आता सी डी . क्यासेटच्या जमान्यात नाही .
        आताही कधी कधी वासुदेव येतो तोही भजन म्हणतो पण त्याच्या भजनाला सिनेमाच्या चाली असतात त्याच्याजवळ मोबाईल असतो त्यावरून तो त्याच्या घरी संपर्कात असतो असाच एक वासुदेव मागच्या आठवड्यात आला होता " वसंत गंगावणे " त्याचे नाव , मोठ्या खेदाने सांगत होता , " महाराज आता पूर्वीसारखे लोक दान करीत नाहीत उलट आम्हालाच काम धंदा करण्यचा सल्ला देतात . मी माझा काम धंदा करतोच आहे त्यात वाद नाही पण ! माझ्या वाडवडिलांची परंपरा जतन करयाची म्हणून मी हे वासुदेवाचे रूप धारण करीत असतो बाकी काही नाही . " त्याचे हे बोलणे ऐकून मी खूप अंतर्मुख झालो काळाप्रमाणे बदलेले पाहिजे हे मलाही मान्य आहे पण ! ह्या लोक परंपरा जतन करणारा वसंत मला फार मोठा वाटला त्याचा मला अधिक आदर वाटू लागला कारण तो त्याचे वैकाक्तिक काम धंदा पाहून हि परंपरा जतन करीत आहे .

अशोकानंद महाराज कर्डिले