भज गोविन्दम ॥१॥

Monday, July 2, 2012

वारी एक सुखी जीवन शैली


                         वारी एक सुखी जीवन शैली
            पूर्वी लोक पंढरपूरच्या वारीहून गावाकडे परत आल्यानंतर त्यांचे स्वागत गावाच्या वेशीपर्यंत टाळ पखवाज घेऊन जाऊन भजन म्हणत करावे लागत असे आणि तो आनंद मोठा अवर्णनीय असा असायचा . तेव्हा दळण-वळणाची साधने फारच कमी त्यामुळे पंढरपूर सुद्धा खूप दूर वाटायचे आणि पायी दिंडीमध्ये गावाचे लोक जायचे व जवळ जवळ २०-२५ दिवसांनी परत येत तेव्हा त्यांनी फार मोठे पुण्य कर्म केले आहे अशा भावनेने  त्यांचे स्वागत होत होते .पंढरपूरची वारी खरे तर महाराष्ट्राची एक जीवन शैली आहे आणि विशेषत:वारक-यांच्या जीवनाचे  एक अविभाज्य अंग आहे .पंढरी , पांडुरंग , चंद्रभागा ,आणि पुंडलिकराय  हि अत्यंत श्रद्धेचे विषय आहेत. वारी केव्हापासून सुरु झाली या मध्ये मतभेद असू शकतात पण एवढे मात्र खरे कि पंढरीची वारी हे श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अगोदरपासून होती किंबहुना माउलीनचे पूर्वज सुद्धा वारकरी होते पंढरीची वारी आणि विठ्ठलाची उपासना त्यांच्या घराण्यात होतीच. " माझे जीवीची आवडी | पंढरपुरा नेईन गुढी ||" हि माउलीच्या जीवीची आवड .."माझे माहेर पंढरी | आहे भिवरेच्या तीरी ||" श्री नाथांनी पंढरीला माहेर म्हटले आहे आणि नाम्देवारायांचे तर वास्तव्यच पंढरीत होते त्यामुळे  .पंढरी , पांडुरंग , चंद्रभागा ,आणि पुंडलिकराय   हे त्यांच्या जीवनाचे अविभाज्य अंग बनले होते. जनाबाईची सखा पांडुरंग , तुकोबारायांचे मनीचे गुज म्हणजे  "सुंदर ते ध्यान उभे विटेवरी | कर कटावरी ठेवोनिया | " हे त्यांचे उघडे ब्रह्म "माझ्या वडिलांची मिराशी | तुझी चरणसेवा पांडुरंगा||" जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांच्या कुळात परंपरेने वारी  चालत आलेली आहे हे स्वत:च तुकाराम महाराज सांगतात.
       वारी  एक व्रत आहे.वारकरी होणे म्हणजे आपली जीवनशैली बदलणे आहे एक सुंदर परिवर्तन आहे . मागे केले पाहू नका | पुढे जमीन आहे तुका || आपली पूर्वीची जीवनशैली विचित्र असते त्यामध्ये दुख: आणि दुखा:चे बीज असते. , प्रपंचामध्ये सुख न मिळता सुखाचा भास असतो पण प्रत्येकाला वाटत असते कि मला संसारात राहून सुख मिळेल . माणसे जवळ येतात ते फक्त स्वार्थाने येतात प्रत्येकाला दुस-याकडून काहीतरी हवे असते "जववरी बरवा चाले धंदा | तोवरी बहिण म्हणे दादा || " किंवा  " संसार दुख:मूळ चहूकडे इंगळ | विश्रांती नाही कोठे रान्त्रांदिवस तळमळ | कवणा मी शरण जाऊ | दृष्टी देई जो निर्मळ ||" संसारामध्ये दुख: आहे, विश्रांती म्हणजे सुख नाही. बरे ! जे सुख आहे तेहि  तात्कालिकच  आहे . आत्यंतिक दुखा:ची निवृत्ती व परमान्दाची  प्राप्ती म्हणजे सुख . जीवाला असे सुख हवे कि ज्यामध्ये दुख: नको आहे पण असे सुख संसारात मिळणार नाही कारण जिथे जे नाही तिथे ते शोधणे म्हणजे वेडेपणा आहे . श्री नामदेव महाराज म्हणतात " सुखालागी करीशी तळमळ | तरी तू पंढरीसी जय एकवेळ |||| मग तू अवघाची सुखरूप होशी | जन्मोजन्मीचे दुख: विसरशी ||||  म्हणजे जर सुख हवे असेल तर महाराज म्हणतात पंढरपूरला गेलास तर तुला नुसते सुख मिळणार नाही तर तूच सुखरूप होशील . आषाढी , कार्तिकी , माघी आणि चैत्री अशा या पंढरीच्या वर्षातील चार वा-या आहेत. शिवाय आळंदी, पैठण, देहू, त्रिंबकेश्वर याही वा-या आहेत. तथापि आषाढी एकादशी आणि कार्तिकी एकादशी हया दोन वार्‍या प्रमुख मानल्या जातात. त्यांतही आषाढीचे महत्व विशेष आहे. ज्यांना वर्षातून एकदाच म्हणजे आषाढीला किंवा कार्तिकीला येणे शक्य असतेत्यांनी तसे केले तरी चालतेपरंतु प्रतिवर्षी किमान एकदा तरी वारी करणेही वारकर्‍याची मुख्य साधना होय.  वारकरी होणे म्हणजे योग्य गुरु पाहून त्यांना शरण जाऊन त्यांच्याकडून गळ्यात तुळशीची मला धारण करायची व " रामकृष्ण हरी हा मंत्र ग्रहण कार्याचा श्रीगुरू  एक प्रकारची आचार संहिता सांगतात त्याप्रमाणे आचरण करायचे . नुसती गळ्यात तुलसीची माळ  घातली म्हणजे वारकरी होत नाही तर त्याप्रमाणे आचरण करावे लागते . एकादशी , सोमवार, हि व्रते , पंढरी, आळंदी, पैठण, देहू हि तीर्थक्षेत्रे, पांडुरंग-रुख्मिणी हे दैवत व ज्ञानेश्वरी , एकनाथी भागवत, व जगद्गुरू श्री तुकाराम महाराजांचा अभंग गाथा हे वारकरी संप्रदायाचे प्रस्थान त्रयी .जो वारकरी होते त्याने अभक्ष भक्षण , अपेय पान करू नये , खोटे बोलू नये , परस्त्री मातेसमान मानणे परपीडा   हे पाप आणि परोपकार हेच पुण्य हि साधी सोपी शिकवण वारकरी साम्प्रदायची आहे . आणि जो वारकरी होतो त्याने जर याप्रमाणे आचरण केले तर त्याची जीवन शैली सुखद आणि आनंदी होते. 
        पायी वारी करणे हे एक वारकरी संप्रदायचे व्रत आहे. पायी वारी घडो | देह संत दारी पडो || किंवा  देह जावो अथवा राहो | पांडुरंगी दृढ भावो || हा वारक-यांचा  निश्चय असतो. पायी वारी करण्याने महत्वाचे फायदे १/- घरापासून माणूस दूर गेला कि नेहमीच्या जीवनात थोडा बदल होतो आणि निसर्गाच्या सान्निध्यात मनुष्य जातो व त्यामुळे वृत्ती अपोआप आनंदी बनते  . २/- वैराग्य वाढते त्यामुळे सत्संगती सहज घडते आणि विचारात बदल घडून विवेक निर्माण होतो. " विवेकावाचुनी न पाविजे समाधान || संत शांतामाई " विवेकावाचून समाधान होत नसते आणि वारीमध्ये संत असतात त्यांच्या सहवासात संत विचाराचे प्रबोधन घडते आणि सहजच विवेक निर्माण होऊन समाधान वाटते.गुरु दाविलिया वाटा| येवोनी विवेक तीर्थ तटा | धुवोनिया मळकटा | बुद्धीचा तेणे || ज्ञानेश्वरी ||   ३/- धर्म प्रचार सहज होतो , धर्म प्रजेचे धारण करतो, धर्म श्रेय मार्गाचे मार्गदर्शन करतो म्हणून धर्म हि एक सुंदर  मानवी जीवन शैलीच आहे  ४/-वारीत  भजनानंद सहज  मिळतो , कारण वारीत काकडा , हरिपाठ , नटाचे अभंग , वाटचालीचे अभंग व वाटचालीचे कीर्तन याद्वारे संगीत गायन नृत्य हे सर्व अपोआप घडत असते. वेगळी योग साधना करावी लागत नाही  ४/- वारीमधील शिस्तव्यवस्थापन हा अनेक देशी-विदेशी अभ्यासकांच्या कुतूहलाचा विषय आहे. वारीमध्ये जमणाऱ्या लोकसमुदायामुळे वारीकडे कॉर्पोरेट जगतही खास लक्ष पुरवतंय.वारीमध्ये जाणार्या वारकर्याच्या अंगी सहज शिस्त येते . ज्ञानेश्वर महाराज , तुकाराम महारज व अनेक संतांच्या पालख्या या दिंडी सोहळ्यात असतात . लाखो लोक असतात यांचे इव्हेंट म्यानेजमेंट कसे होत असेल हा एक अभ्यासाचा विषय आहे .उन वारा पाऊस या सर्व प्रतिकूल परीस्थ्तीवर मत करीत दिंडीमध्ये पायी चालत व मुखाने भजन करीत जावे लागते तेव्हा सहजच शरीरात सुद्धा प्रतिकारशक्ती निर्माण होते यालाच तितिक्षा म्हणतात. सुख दुखा:चा अनुकूल प्रतिकूल परिणाम मनावर आणि शरीरावर न होता " स्थितप्रज्ञाता" प्राप्त होते मग संसारात काहीही अनुकूल प्रतिकूल घडले तरी काहीही वाटत नाही . समयासी सदर व्हावे | देव ठेवील तैसे राहावे || संत श्री सावता महाराज हे शिकवण जीवनभर पुरते. ५/- वारीमध्ये जातीभेद , वर्णभेद , वर्गभेद काहीही मानीत नाहीत सर्व समान असतात. कितीही मोठा अधिकारी असला तरी तो पायीच चालतो आणि एका पंगतीमध्येच भोजन करतो. लहाह्न मोठा हा भेद राहत नाही "भेदाभेद भ्रम अमंगल | हि अत्यंत महत्वाची शिकवण वारीमध्ये मिळते. समाजाचे हेच खरे परिवर्तन आहे.सत्य ,प्रेम , करुणा , दया  सेवा हे सात्विक भाव अपोआप तयार होतात. ६/- वारीमध्ये कुठल्याही प्रकारचे कर्म कांड महत्वाचे मानले जात नाही. " चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा || आणिक दर्शन विठोबाचे ...यापलीकडे वेगळे कर्मकांड नाही.  जगद्गुरू श्री तुकाराम महाराज आपल्या एका अभंगामध्ये फार छान छान सांगतात








 "उदंड पाहिली उदंड ऐकिली । उदंड वर्णिली क्षेत्र ख्याती ॥१॥
 ऐसी चंद्रभागा ऐसें भीमातीर । ऐसा विटेवर देव कोठें ॥२॥
 ऐसे संतजन ऐसे हरीदास । ऐसा नामघोष सांगा कोठें ॥३॥
 ऐसा पुंडलीक ऐसें वाळवंट । ऐसी मुक्तिपेठ सांगा कोठें ॥४॥
 तुका म्हणे आम्हा अनाथाकारणें । पंढरी निर्माण केली देवें ॥५॥

काशी गया व इतरही अनेक तीर्थे आहेत तेथे गेल्यावर निरनिराळे व्रते व कर्मकांड करावे लागते दान धर्म करावा लागतो येथे तसे काहीच नाही कीर्तन श्रवण भजन प्रवचन याला महत्व आहे कारण श्रवनामुळेच खरे परिवर्तन होते. व मानवी जीवन सुखी समाधानी आणि आनंदी होते. म्हणून वारी हि एक आनंद यात्रा आहे, वारी हि एक परिवर्तन यात्रा आहे, वारी हि एक सुखी जीवन शैली आहे.



(दिनांक ३०-६-२०१२ रोजी दैनिक केसरीमध्ये प्रसिध्द झालेला लेख या ठिकाणी पुन: प्रसिध्द करीत आहे.)